Blog
टपाल कर्मचारी दिवस
- July 1, 2024
- Posted by: Instucen
- Category: Commemorative Uncategorized
आजच्या इंटरनेटच्या जमान्यात पोस्ट खात्याकडे आपलं विशेष लक्ष जात नाही पण त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे आणि त्या कामाचा इतिहास रंजकसुद्धा आहे. आपल्याकडे राजेराजवाड्यांच्या काळात घोडेस्वार , सांडणीस्वार ( उंटावरून जाणारे )आणि पायी जाणारे ‘ पोस्टमन ‘ होते . कबुतरांचा संदेशवाहक म्हणून वापर तर पुरातन काळापासून होतो आहे . अर्थात त्या काळी पोस्टमन हे नाव नव्हतं त्यांना, पण संदेशाची देवाणघेवाण असायची , तीही बहुदा राजकीय खलित्यांची .१७६६ साली रॉबर्ट क्लाइव्ह ने सार्वजनिक टपाल खात्याची भारतात स्थापना केली आणि १७७४ मध्ये कोलकाता १७८२ साली मद्रास आणि १७८४ साली मुंबई मध्ये GPO (जनरल पोस्ट ऑफिस) उघडण्यात आली .
उन्हातान्हात , पाऊस वाऱ्यात बहुतांशी पायी फिरणारे पोस्टमन आपल्याला दिसतात पण अनेक देशात पोस्ट खात्यात कित्येक प्राण्यांनी सुद्धा सेवा बजावलेली आहे बरं! चक्क कुत्रे, मांजरी सुद्धा टपाल खात्याचे कर्मचारी असल्याचे दाखले आहेत . खरं तर मांजर बरोब्बर वाट शोधत त्याच्या नेहमीच्या ठिकाणी येतं आणि टपाल खात्यात त्याच्या या गुणांचा वापर व्हायला हवा होता ,पण त्यांची नेमणूक पोस्टातले उंदीर मारायच्या कामावर झालेली आणि त्यांनी ते काम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे दाखले आहेत. त्यांना त्याबद्दल पगार पण मिळायचा. इतकंच काय पण ते मानधन कित्येक वर्षात वाढवून दिलं नाही म्हणून त्यांच्या वतीने माणसांनी टपाल खात्याला चक्क धारेवर धरलं आणि टपाल खात्याने त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केल्याची गंमतशीर नोंद आहे.
टपाल खात्यातल्या घोड्यांसाठी वेगळी व्यवस्था असायची. विशिष्ट अंतरावर त्यांच्या साठी पागा असायच्या आणि तिथे ताज्या दमाचे घोडेसुद्धा असायचे. काही वेळा घोडे टपालखात्याच्या थेट सेवेत नसायचे तर कंत्राटी कर्मचारी म्हणून सुद्धा असायचे. असं असलं तरी त्यांना आजारपणाची सुट्टी असायची. अगदी त्यासाठी पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र जोडून रजेचा अर्ज केलेला असायचा.
रेनडिअरच्या गाडीतून बर्फातून घसरत मुलांसाठी भेटी वाटत येणारा नाताळबाबा ठाऊक आहे आपल्याला. तर त्या रेनडिअरनी सुद्धा काही काळ टपाल खात्यात आपलं योगदान दिलं आहे. १८३० ते १८५० मध्ये ससेक्स परगण्यात चार कुत्तू मंडळी टपालाची गाडी ओढून नेत असत आणि एकदा त्यांच्या गादीवर रस्त्यात चोरांनी हल्ला केला अशीसुद्धा नोंद आहे. अमेरिकेत १९१० सालापासून ते १९३० पर्यंत कुत्रे बर्फातून गाड्या ओढत टपाल पोहोचवीत असत. १९३० नंतर जरी या मार्गांवरून छोट्या विमानांद्वारे टपाल पोहोचवले जायला लागले तरी कुत्र्यांची घसरगाडी ही आणीबाणीच्या काळात वापरता येईल अशी कायद्यात तरतूद होती .१९६३ नंतर मात्र हा मार्ग बंद करण्यात आला.
जगातील सर्वाधिक मोठे टपाल वितरणाचे जाळे भारतात आहे .जगातले सगळ्यात जास्त उंचावर असणारे पोस्ट ऑफिस भारतात आहे हे ठाऊक आहे तुम्हाला ? हिमाचल प्रदेशातल्या हिक्कीम इथे असलेले हे पोस्ट ऑफिस १९८३ पासून सुरु आहे. श्रीनगरच्या दाल लेक मध्ये चक्क तरंगते पोस्टऑफिस आहे. जगातील पहिली हवाई टपाल सेवा भारतात १९११ मध्ये सुरु करण्यात आली. आपल्याकडे ओडिशा मध्ये पोलिसांची कबुतर संदेशवहन सेवा आहे. १९८२च्या पुरात किंवा १९९९च्या चक्रीवादळात जेव्हा इतर संदेशवहन सेवा पूर्ण बंद झाल्या होत्या तेव्हा या कबुतरांनी मात्र संदेशवहन चालू ठेऊन मोठंच काम केलं.
भारतात टपाल खात्यात कितीतरी स्त्रिया काम करायच्या पण पोस्ट वूमन किंवा टपाल सखी म्हणू आपण, अशी पहिली स्त्री १९८२ साली दिल्ली येथे टपाल खात्यात रुजू झाली. तिचे नाव इंद्रावती. त्या नंतर आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया टपालचा बटवाडा करताना दिसतात. हिमाचल प्रदेशात दोनशेहून अधिक स्त्री टपाल वितरक आहेत. दिवसाला तब्बल १० ते १२ किलोमीटर पायपीट करत त्या टपालाचे वितरण करतात. पाऊस असो वा बर्फवृष्टी त्यांचे काम चालूच असते. अडचणी आल्या तरी गावागावात जाऊन त्या हिमतीने टपाल , पेन्शन वितरित करतातच.
करोना काळात इतर कुरीयर सेवा पूर्ण बंद असताना टपाल खात्याने औषधे आणि इतर सामग्रीची यथायोग्य सेवा पुरवली हे आपण जाणतोच.
म्हणूनच वर्षानुवर्षे अथकपणे सामान्यांच्या सेवेत असलेल्या या पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांचा एक जुलै हा गौरव दिवस जगभर साजरा केला जातो.
Dnyaneshwari Kamath |